कविता क्रमांक ११ ते २०

11. गुलबक्षी

बागेत माझिया दारावरती
बोगन वेल अशी बहरली
शिशिर ऋतूच्या प्रभात काळी
महिरप देखणी फुलांची सजली

डहाळी, डहाळी अशी ओघळली
किरणस्पर्शाने मोहरली
पुष्पकुंजाने रेखीली मोहक नक्षी
रंग तयांचा तलम गुलबक्षी

रेशमी,पाकळी अशी अलवार
रुप यौवना जशी सुकुमार
झुळझुळ वाऱ्यास अशी बिलगली
तालावर त्याच्या जणु थिरकली

सुगंध जरी नसे प्राक्तनी
तुप्त  रहाते सुखी मनोमनी 
गंध विरहित तरीही आनंदी
निखळ हासते तरी स्वच्छंदी

जणू मिरवत आंनद तुरे
सर्वा सांगे रहा हासरे
ईश कृपेने  लाभले जे सुंदर
असावे समाधानी, तृप्त निरंतर

सौ.भारती श्रीनिवास शुक्ल.
नाशिक

12. बकुळी

गर्द भारल्या हरीत तरूवरी
बिलगता वारा बकुळ फुलांवरी
बरसात सुवर्णि पडे भूवरी
परिमल दरवळे दशदिशा अबंरी

तलम पाकळी रुप झिरमीरी
गंधबावरी जणू भिगंरी
रंग अलवार फिका तपकिरी
आभा सावळी तरी गोजिरी


रामप्रहरी बकुळ तरूतळी
टिपता नाजूक फुले ओंजळी
घमघमती किरणात सोनसळी
नजाकत तयाची बहू आगळी


प्राषिता श्र्वास दिर्घ अंतरी
रोमांचित गात्रे सूर अत्तरी
रुंजीते सुरावट तनमनावरी
जणू जादूई कृष्ण बासरी

सौ.भारती श्रीनिवास  शुक्ल
नाशिक

13. श्रावण

गर्द शामल घन मेघाचे
गगनी घुमू लागले चौघडे
सौदामिनीचे चंचल नर्तन
अवचित प्रकाश पसरे चहूकडे


वाहती वारे मत्त जाहले
दूरदूरवर मृदगंध दरवळे
अभिषेक जलमोत्याअंचा होता
आनंदाचा झरा खळखळे


मलिन सृष्टी शुचित भिजली
अणूरेणुतच अशी निखरली
मरगळीची कात टाकूनी
नवचैतन्यानी अवघी उजळली


थेंब मोत्याचे असे ओघळती
पानोपानी जणू थबकती
श्रावणातल्या मंद किरणांनी
आरासनक्षी किती चमकती


इन्द्रधनूचे  मुकूट मिरवत
वसुंधरा ही सुंदर नटली
हिरव्या शालूत जणु षोडशा
श्रावणातल्या उन्हात हसली


सोनेरी चाफा , गंधीत मारवा
अबोली,दूर्वा बेल हिरवा
सप्तरंगाची करून  लयलूट
रंगीत, गंधीत श्रावण आला


व्रत वैकल्याचा घेऊन महिमा
सणवाराचा आनंद सोहळा
दाही दिशानी उधळीत हिरवळ
श्रावण नटला, श्रावण सजला

सौ.भारती श्रीनिवास शुक्ल
नाशिक

14. गुलमोहर

वसंतॠतुच्या मैफिलीतला
राजदूत गुलमोहर धुंद बहरला
निसर्गशिल्प हे असे वैभवी
दिमाखात जणु रूप गौरवी


ऊन्ह कवडसे तांबुसलेले
डहाळी डहाळी झिम्मा खेळे
आगपेटले जणू निखारे
फाद्यांवरती फेर धरे


वार्याच्या मुक्त झुलत्या पदरी
नर्तन करती उज्ज्वल लहरी
मध्यान प्रहरी निल अबंरी
जणु साडंले चांदणे केशरी


पुष्पवृष्टीच्या पायघडयाची
सुवर्णि रंगावली सजे
अदाकारीवर या कलाकाराच्या
अवघी सृष्टी मुग्ध हसे

सौ भारती श्री निवास शुक्ल
नाशिक

 

15. स्वप्नपूर्ती

स्वप्नपूर्ती सोहळ्याचा
आला दिन सोनियाचा
रामभक्ताच्या मनीचा
आनंदोत्सव चैतन्याचा.


गावागावातून आणलेली
रामनामाचीच वीट
कारसेवकांनी मांडीयली
अयोध्या नगरीत थेट.


वर्षे पाचशे नी आला
आज ऐतिहासिक दिन
प्रभूरामाच्या मंदिराचे
थाटले हे भूमिपूजन.


लकाकती घरेदारे
सारवलेल्या अंगणात
शोभिवंत रांगोळ्याची
रंगलेली नजाकत.


घरोघरी आनंदाच्या
विजय पताका झळकती
देवस्थाने सारी देशातील
रोषणाईत उजळती.


दिपकळ्यानी झगमगती
शरयुचे दोन्ही तिर
सिचंयीले  सारीकडे
पावन क्षेत्रातील  निर .


रामचंद्राचा चालला
अविरत जयघोष
राममय अयोध्येत
भगवाच अभिषेक.


बहुरंगी कूसुमाअंची
सुगंधीत बरसात
लक्ष्मीकमळानी केली
सजावट मंदिरात.


झाले दिमाखात दिव्य
सोहळ्याचे पौरोहित्य
उच्च मानवी मूल्यांच्या
स्थापनेचे हेच सत्य.


याची देही याची डोळा
पाहणारे भाग्यवान
पिढीतील आम्ही सारे
खरोखर नशीबवान.


अद् भूत  कलाकृतीचा नमुना
वास्तुशिल्पाचा  नजराणा
देईल आगामी पिढीला
शांततेची सुप्त प्रेरणा.


कोटी कोटी भारतीयांनी
सुरू केलेली रथयात्रा
स्वप्नंपूर्ती सोहळ्याने
झाली पुर्ण यशोगाथा.

सौ.भारती श्रीनिवास  शुक्ल
नाशिक.

16. जीवन गाणे

कल्पनांच्या नवकिरणांनी
आकांक्षाना पंख फुटावे

दिपकळ्यानी आशेच्या मग
स्वप्नांचे इन्द्रधनू सजावे


सूर, लय,ताल रंग घेवूनी
निमिषातच आयुष्य जगावे
भावभावनांच्या हिंदोळ्यावर
जगण्याचे खरे अर्थ कळावे


अशीच फुलावी जिवनकविता
शब्दांच्या प्रेमात पडावे
मनासारखी तार छेडीता
सुरेल त्याचे गाणे व्हावे


सार्थ आपुला जन्म वाटूनी
अभिलाषाना तेज चढावे
नवरसांना प्राषन करिता
मनमोराने नृत्य करावे


हितगुज करावी पानाफुलांशी
गुपित तयांचे जाणून घ्यावे
सानिध्यातच निसर्गाच्या
दानत्वाचे सुख कळावे


समंजसतेने संयम ठेवून
क्षण प्रत्येकच जगून घ्यावा
इथेच  शोधू स्वर्ग निरंतर
मरणानंतर कुणी पाहिला


क्षणभंगुर हे जिवन आपुले
मुक्त मनोरथ पूर्ण करा
चिरतरूण  मन हे असता 
जगण्याचा आनंद खरा


आनंदच मग देता घेता
हसता फुलता आयुष्य सरावे
मानवतेची घेऊन  शिकवण
अवघे जिवन धन्य व्हावे.

सौ.भारती श्रीनिवास शुक्ल
नाशिक.

 

17. चैत्रगौर

नवचैतन्याचा चैत्र सळसळला
गौरी तृतीयेचा सण हा आला
ताम्रपल्लव तोरण दारी झुलते
कोकिळ पंचम सुखद भासते…..


मोहोर गंधाळ आम्रतरूवरी
घमघमता चाफा दिव्यप्रभेपरी
रसगंधाची लयलूट पसरे
उत्सव लावण्य सृष्टीचा चहूकडे..

पहाट प्रहरी उठून लवकरी
पूजा नैवेद्याची लगबग सारी
सुबक सारवल्या गंधीत अंगणी
शुभचिन्हांची रंगावली रेखूनी…..


गुफिंता सोनसळी पुष्पमाळा
घरपरीसर अवघा घमघमला
ठेवणीतली तलम सुगंधी
रंग अंजीरी पैठणी देखणी….

अंथरली नक्षीदार चौरंगी
उतरण करण्या पाट चंदनी
मोगरमोत्यांची महिरप सजली
चैत्र गौरीची आरास खुलली….

कमानींदार पितळी झुल्यावरी
तृतीयेची गौराई विराजली
धुपदिप पूजेच्या वेळी
पंचपक्वानाची ताटे सजली…

कंच हिरव्या केळीच्या पानी
चटक कैरीची डाळ बहूरंगी
मधुर केशर पन्ह्याची वाटी
संध्यासमयी येता सुवासिनी

हास्यांचे कारंजे उसळती
कुंकुम तिलक सजवून भाळी
कोवळ्या हरबर्याची ओटी भरली
बकुळ फुलांची देवून वेणी

प्राषिला प्रसाद सकळ ललनांनी 
नवचैतन्याचा चैत्र हासरा
मंगल सोहळा झाला साजरा 

सौ.भारती श्रीनिवास शुक्ल
नाशिक.

18 रानभर

राघव प्रहरी नभी रंगांचा सोहळा
दिशा जागल्या गुलाबी रानभर…..
सोनसळी उन्हे धुंद झिम्मा खेळे
होई सुगंधी कहर रानभर….


दवबिंदूच्या कळ्या,राजवर्खि फुले
वार्याची बासरी वाहे रानभर ….
.पानांच्या टाळ्या,नदीची निळाई
वाजे राऊळीची घंटा रानभर…


मध्यान प्रहरी  सुर्य येता डोईवर
गर्द छायेचा पदर रानभर….
फुले इवली जांभळी पिवळी
डहाळी भारली  झुले रानभर….


गाई वासरे चरती, रानमेव्यास बहर
मधुगंध तयाचा पसरे रानभर….
संध्यासमयी दूर नारंगी आभाळ
पाखरांच्या ओळी  खुले  रानभर…


पडे अंधार  काहूर नभी टिपूर चांदणे
चंद्र मोत्यांची शिंपण रानभर….

सौ.भारती श्रीनिवास शुक्ल
नाशिक.


19. काव्यछंद

छंद जिवा,रोज नवा
चित्र काव्यरचना करण्याचा
रंग नवे ,गंध नवे
मुक्त त्यात भिजण्याचा

शोभिवंत सारेच प्रहर
क्षणोक्षणी बघण्याचा
अचंबित   होऊनी सुगंधात
आकंठ  दरवळण्याचा

निसर्ग किमया ही अद्भूत
ईश्वर लीलेस नमण्याचा
सोहळ्यात ऋतूरंगाच्या
मनसोक्त फुलण्याचा

त्याग,प्रित,विरह,मित
भावविभोर होण्याचा
राधाकृष्ण अमरप्रेम
अंतरंगी उमगण्याचा

नवरसात,शब्दफुलांत
चिंब चिंब नाहण्याचा
रंगविभोर  नजार्यात
अलवार खुलण्याचा

चंद्र, तारे,सौंदर्य  सारे
नजरेत टिपण्याचा
नजाकतेस या बघून
पुन्हा पुन्हा  बहरण्याचा

रसरंगास प्राशन करून 
मंत्रमुग्ध  होण्याचा
निसर्ग सौंदर्य हे उदात्त
डोळामिठीत जपण्याचा 

सार्थ जन्म वाटूनी
कृतार्थ होत जगण्याचा
जिवनक्षण रोमरोमातुन
आनंद रम्य लुटण्याचा

पिसे जिवास लागुनी
ऋतूविनाही बहरण्याचा
स्वप्नवत हिंदोळ्यावर
खुशाल उंच उडण्याचा

अनुभुती ही विलक्षण
आनंद परमोच्च जगण्याचा
परोपकार हे औदार्य
सृष्टीतूनी शिकण्याचा

छंद जिवा रोज नवा
चित्र काव्यरचना करण्याचा
रंग नवे, गंध नवे
मनसोक्त  त्यात भिजण्याचा

सौ.भारती श्रीनिवास शुक्ल
नाशिक.

20. वसंत पंचमी
Vasant Panchami

आला वंसत पंचमीचा महिमा  
सरस्वती देवीचे पूजन करूया
सृजन सोहळा उत्साहाचा 
ऋतूराज बहरला निसर्गाचा 

रसगंधाची करी लयलूट 
वसंत ऋतू राजाचे  वैभव 
अशोक  गुलमोहराच्या तरूवर
लकाकती कोवळे ताम्रपल्लव 

रेशिमलडी  जणू   अश्या   उलगडे
पिवळ्या प्राचीची वंसत ऊन्हे 
फुले ही पिवळी इवली इवली 
पिवळाच उत्स्हव  चोहीकडे 

संक्रांतवेलीवर  धुंद नाचती
केशर रंगी हर्ष तुरे 
कात टाकूनी पानगळीची 
उजळले सर्व दूर नारंगी  सडे  

वाहती मत्त माघाचे वारे
थोडे  गुलाबी थोडे बोचरे 
शहारल्या कायेवर सृष्टीच्या
फुलवती अलगद  आनंद धुमारे

नृत्य  गीत रंग  साहित्य 
बहूकलाअंची  जाणून रंगत 
परीसस्पर्शाने नाहूनी त्यांच्या 
वसंत पंचमीचे करूया स्वागत 

सौ भारती श्री निवास शुक्ल
नाशिक.